महाराष्ट्र

मोहिते पाटलांनी संस्था, कारखाने, बँका बुडवण्याचे काम केले – खा. रणजितसिंह निंबाळकर

सांगोला (एसकेपी महाराष्ट्र न्यूज)

गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत फाटा फुटला, तरीपण कॅनॉलमधील पाणी आटलं नाही, इतकं पाणी दिलं आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मावळत्या सूर्याची शपथ घेवून पवारांनी सांगितलं होतं. पण, पवारांनी सांगोल्याच्या हक्काचं पाणी बारामतीला पळवून नेले. लोकांना पाण्याची खोटी आशा दाखवली म्हणून पवारांचे आमदार फुटले, घर फुटलं. पवारांनी सांगोल्याचे पाणी २० वर्षापासून पळवून नेले आहे. अकलूजकरांच्या घरात आमदारकी दिली, कारखान्याला मदत केली, मात्र ते स्वार्थासाठी रात्रीत पक्ष बदलून गेले. ५० वर्षे सत्ता घरात असतानाही मोहिते पाटील यांनी संस्था, कारखाने, बँका बुडवण्याचे काम केल्याचा आरोप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला.

माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाऊसाहेब रूपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगेवाडी, मांजरी, वाढेगांव, मेडशिंगी, आलेगांव, वाकी घेरडी, सोनंद, जवळा येथे कॉर्नर सभा पार पडली. यावेळी सागर पाटील, दादासाहेब लवटे, अतुल पवार, जगदीश पाटील, दुर्योधन हिप्परकर, शिवाजीराव गायकवाड, वसंत सुपेकर, राजश्री नागने, नवनाथ पवार, शंभू माने, विजय बाबर, समीर पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील १२५ देशांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मोदींनी सांगोल्याला जलजीवन मिशन योजनेसाठी ८५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. लोकसभेत पवारांना, मोहिते पाटलांना या मतदारसंघातून निवडून दिले पण, त्यांनी तालुक्याचा एकही प्रश्न सोडविला नाही. टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा या सिंचन प्रकल्पांतून पाणी आणले आहे. कोयना धरणातून माण नदीला पाणी सोडण्याची जबाबदारी फडणवीसांनी घेतली होती म्हणून, आज ऐन उन्हाळ्यात माण नदीला पाणी आले आहे. मोहिते पाटील यांनी गेली ५० वर्षे सांगोल्याचं पाणी अडवलं हे जगजाहीर असल्याचा आरोप आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.

यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, देशाचे भवितव्य घडविणारी ही लोकसभेची निवडणूक आहे. ५० वर्षात विकासाच्या बाबतीत सांगोला तालुक्याची उपेक्षा झाली. ५० वर्षांपासून पाण्याची भीक मागत होतो पण, त्यावर राजकारण झालं, मात्र, पाणी मिळाले नाही. मोहिते पाटलांनी ५० वर्षे तालुक्यावर अन्याय केला. अस्तरीकरणाला माळशिरसकरांनी विरोध केला. ज्यांनी पाणी अडवलं तेच आज मत मागण्यासाठी फिरत आहेत. आमच्या हक्काचे पाणी का दिले नाही, याचा जाब शेतकऱ्यांनी विरोधकांना विचारावा असे आवाहन माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button